आमदार सतेज पाटील टी-२० क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन थाटात
कोल्हापूर : शाहूपुरी जिमखाना ग्राउंड येथे आमदार सतेज पाटील टी-२० क्रिकेट स्पर्धा २०२६ चे उद्घाटन उत्साहात पार पडले. कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे व विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
शाहूपुरी जिमखान्याचे सचिव संजय शेटे यांनी स्वागत करून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. गेल्या २१ वर्षांपासून ही स्पर्धा सातत्याने आयोजित करण्यात येत असून, या माध्यमातून कोल्हापूरात अनेक गुणवंत क्रिकेटपटू घडले असल्याचे त्यांनी सांगितले. शाहूपुरी जिमखाना तर्फे टी-२० स्वरूपातील ही स्पर्धा विशेषत्वाने घेतली जाते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी राजेश लाटकर यांनी स्पर्धेच्या उपक्रमाचे कौतुक करत, फुटबॉलप्रेमी कोल्हापूरात क्रिकेटची लोकप्रियता वाढत असल्याचे सांगितले. क्रिकेटकडे केवळ खेळ म्हणून न पाहता, त्यातून करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रमेश कदम क्रिकेट अकॅडमीने शाहू क्रिकेट अकॅडमीवर ११ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना रमेश कदम क्रिकेट अकॅडमीने १५५ धावा केल्या. सूरज राजपूत (३६), धैर्यशील पाटील (२७) व स्वप्निल कदम (२९) यांनी योगदान दिले. शाहू क्रिकेट अकॅडमीकडून राहुल वाजंत्री, अथर्व ओतरी व मयूर दळवी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल शाहू क्रिकेट अकॅडमीचा डाव १४४ धावांवर आटोपला. देवेश वराडे (३२), ओंकार पवार (२९) व विशाल पाटील (२७) यांनी धावा केल्या. रमेश कदम क्रिकेट अकॅडमीकडून रोहन सावंत (३ बळी) व जसबीर दुधानी (२ बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी केली.
दुसरा सामना शाहूपुरी जिमखाना व एम. जी. स्पोर्टस यांच्यात झाला. एम. जी. स्पोर्टस संघाने प्रथम फलंदाजी करत १२.१ षटकांत ५ गडी बाद ९५ धावा केल्या. मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी रमेश पुरेकर यांनी आभार मानले.
यावेळी नगरसेवक प्रवीण केसरकर, विनोद कांबोज, सुजय होसमनी, केतन शहा, राजेंद्र मिठारी, दिवाकर पाटील तसेच शाहूपुरी जिमखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.