कागल एमआयडीसीतील कारखान्याच्या कापूस गोदामाला भीषण आग...

<p>कागल एमआयडीसीतील कारखान्याच्या कापूस गोदामाला भीषण आग...</p>

कागल - शनिवारी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मॅक चौक परिसरात सुदर्शन जीन्स कारखाना आहे. सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास या कारखान्याच्या कापूस गोदामातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येऊ लागल्याचे सुरक्षा रक्षक आणि कामगारांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती अग्निशमन दलाला दिली.

घटनेची माहिती मिळताच कागल नगरपरिषद, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कोल्हापूर महानगरपालिका, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे मिळून पाच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. गोदाम सर्व बाजूंनी बंदिस्त असल्यामुळे आत मोठ्या प्रमाणात धूर साचला होता. त्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवताना मोठी अडचण येत होती. अखेर जेसीबी मशीनच्या साह्याने गोदामाच्या मागील बाजूचे पत्रे काढण्यात आले. त्यानंतर आत साठवलेल्या कापसाच्या गाठींवर पाण्याचा मारा करण्यात आला. पेट घेतलेल्या कापसाच्या गाठी जेसीबीच्या मदतीने बाहेर काढून आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत नेमके किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.