जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

<p>जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमा यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न</p>

वाडी रत्नागिरी - दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची आज मुख्य चैत्र यात्रा. पहाटे तीन वाजता मंदिरात घंटा नाद करून आजच्या मुख्य यात्रेला सुरुवात झाली. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी होणारा शासकीय महाभिषेक मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर दुपारी साडे बारा वाजता मंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील इनाम पाडळी या एक नंबर सासनकाठीचं विधिवत पूजन करून सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकयन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, जोतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आजच्या यात्रेसाठी महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यातून सुद्धा लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते. गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत हलगीच्या निनादात सासन काठी नाचवत लाखो भाविक यात्रेत दंग झाले होते.

 

राज्यातील भाविकांच्या आयुष्यात आंनद आणि सुख शांती येवो अशी जोतिबा चरणी सदिच्छा व्यक्त केली असल्याचं मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं.

प्रशासनाच्या वतीनं भाविकांना सोयी सुविधा देण्यात आल्या असून मागील वर्षपिक्षा यावर्षी भाविकांची मोठी संख्या असल्यानं यात्रेमध्ये उत्साह दिसून येत असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं.

दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्यानं भाविकांची काही काळ तारांबळ उडाली. चैत्र यात्रेनिमित्त आज जोतिबा देवाची सालंकृत सरदार रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. सायंकाळी साडेपाच वाजता तोफेची सलामी देऊन जोतिबाच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. ही पालखी सायंकाळी साधारणपणे साडे सहा वाजता यमाई मंदिरात गेल्यानंतर तिथं यमाई देवीचा जमदग्नी बरोबर विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी पालखी वर गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविकांनी पालखीच दर्शन घेतलं.