डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक तर्फे डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न
कोल्हापूर - कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने दहावीनंतरच्या करिअर संधी आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली. दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दहावीनंतरच्या शिक्षणासाठी नेमके कोणते क्षेत्रा निवडायचे याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतात. ही गोष्ट लक्षात घेऊन डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्यावतीने या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके आणि उपप्राचार्य प्रा. नितीन माळी यांनी मार्गदर्शन केले. याला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी, दहावीनंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत, करिअरचे क्षेत्र कसे निवडावे, विद्यार्थ्यांची आवड आणि क्षमता याला महत्व कसे द्यावे, ए आय कॉम्प्युटर सायन्स आणि कॉम्प्युटर इंजिनियरींग यामधील फरक, डिप्लोमाचे फायदे काय आहेत, डिप्लोमानंतर पुढे डिग्रीसाठी अॅडमिशन कसे मिळते, डिप्लोमानंतर नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्री स्पॉन्सर्ड डिग्री शिक्षण कसे घेता येते, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रा. नितीन माळी यांनी, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी पार पडते. प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे लागतात, प्रवेशासाठीच्या फेऱ्या किती आणि कशा असतात, ऑप्शन कसे भरावे याबद्दल मार्गदर्शन केले. डी वाय पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे चार अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. एम एस बी टी इ मुंबईकडून पॉलिटेक्निक मधील विविध विभागांना सातत्याने व्हेरी गुड हे मानांकन प्राप्त झाले आहे. या तंत्रनिकेतनमध्ये शासकीय नियमानुसार मुलींना मोफत शिक्षण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या वीस मे पासून डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले आहे. यावेळी रजिस्ट्रार महेश रेणके, प्राध्यापिका वैष्णवी पाटील यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.