9 जून रोजी “न भूतो न भविष्यती" मोर्चाचा इशारा...शक्तीपीठविरोधात सर्वपक्षीय आक्रमक

<p>9 जून रोजी “न भूतो न भविष्यती" मोर्चाचा इशारा...शक्तीपीठविरोधात सर्वपक्षीय आक्रमक</p>

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी ९ जून रोजी कोल्हापुरात “न भूतो न भविष्यती” असा सर्वपक्षीय भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याची घोषणा आमदार सतेज पाटील यांनी केली. शक्तीपीठ महामार्गामुळे शेती, पर्यावरण, नद्या आणि पूरस्थितीवर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. आज शक्तीपीठ महामार्गविरोधी सर्वपक्षीय मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी आमदार पाटील म्हणाले, “हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नसून केवळ राजकीय उद्देशाने राबवला जात आहे. १३ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पामुळे बाधित होणार आहेत. सात-आठ नद्या ओलांडून जाणाऱ्या या महामार्गामुळे भविष्यात पूरस्थिती अधिक गंभीर होईल.”
निवडणुकांपूर्वी सरकारने महामार्गाचा फेरविचार करण्याचे संकेत दिले होते; मात्र निवडणुका संपताच पुन्हा प्रकल्पाला गती दिल्याचा आरोपही त्यांनी केला. “एक लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या महामार्गापेक्षा गावोगावी रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधा उभारण्यासाठी निधी वापरावा,” अशी मागणी त्यांनी केली.

येत्या २२ तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी हरकती दाखल करण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रत्येक गावात बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या सह्या, सातबारा उतारे आणि ग्रामसभांचे ठराव जमा करण्याचे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. तसेच २००५, २०१९ आणि २०२१ च्या महापुरांबाबत ग्रामपंचायतींचे दाखले गोळा करण्यास सांगितले.

“ही केवळ नकाशावरील रेषा नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागला, तर आम्ही जेलमध्ये जाण्यासही तयार आहोत,” असा इशाराही त्यांनी दिला. ९ जून रोजी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, शेतकरी, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार के पी पाटील, संपतराव पवार पाटील, राजू बाबा आवळे, राजीव आवळे, संपत देसाई, गिरीश फोंडे, विजय देवणे, गोपाळ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.