निवडणुकींना शक्ती देणारा हा महामार्ग : आ. सतेज पाटील यांचा हल्लाबोल...
जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ जून रोजी महामोर्चा काढणार
कोल्हापूर – हा महामार्ग शक्तीपीठ महामार्गाला जोडणारा नाही तर, निवडणुकींना शक्ती देणारा हा महामार्ग असल्याचा हल्लाबोल आ. सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. सर्वपक्षीय शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
या महामार्गाबाबत राज्य सरकारकडून हरकती मागवण्यात येत आहेत. यासाठी २२ तारेखेपर्यंत अर्ज करून हरकती घ्या आणि प्रांताधिकाऱ्यांकडे जास्तीत जास्त अर्ज दाखल करण्याचे आवाहन आ. सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच या महामार्गाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर ९ जून रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी राजू शेट्टी यांनी, या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला कवडीमोल किंमत मिळणार आहे. गरज नसलेल्या महामार्गाला आम्ही विरोध करतोय. कारण हा महामार्ग खासगीकरणातून उभा केला जाणार आहे. कर्ज काढून हा मार्ग होतोय याचा टोल तुमच्याकडूनच वसूल केला जाणार आहे. सरकार एक रुपयाही यात घालणार नाही.
२०२९ च्या निवडणुकींसाठी ५५ हजार कोटी रुपये त्यांना हवे आहेत हे तुम्ही या महामार्गातून द्यायची आहेत त्यासाठी हा ५५ हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी खटाटोप सुरु आहे. यातून समर्थन करणारा आणि विरोध करणार अशी दोन गट होणार आहेत. अव्यवहारी असणारा हा महामार्ग आहे. हा महामार्ग झाल्यास सांगली, कोल्हापूरमधील शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पादनामध्ये २५ लाख टनाची घट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आ. सतेज पाटील यांनी, नुकताच पार पडलेल्या निवडणुकीनंतर सरकार विचार करेल अशी आम्हाला आशा होती परंतु असं झालं नाही. सरकारमध्ये याबाबत संभ्रमता आहे. हा महामार्ग शक्तीपीठ महामार्गाला जोडणारा नाही तर निवडणुकींना शक्ती देणारा हा महामार्ग आहे.
आता शक्तीपीठ महामार्गाला जमीन द्या म्हणणारे तुमच्याकडे येतील त्यांना १० टक्क्यांचं कमिशन असा आता त्यांचा फार्मुला ठरलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जागृत करण्यासाठी ७८ गावांमध्ये बैठका झाल्या पाहिजेत. तालुक्यांमध्ये मेळावे झाले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे विजय देवने, माजी आमदार राजू बाबा आवळे, के. पी. पाटील, प्रा. उदय नारकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, चेतन नरके यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.