इचलकरंजीत धक्कादायक प्रकार : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून उकळले पैसे... तरूणाला अटक
इचलकरंजी – शहराजवळील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याकडून पैसे उकलण्याचा प्रकार तोहीद इकबाल पटाईत या तरुणाने केला आहे. त्याला शिवाजीनगर पोलीसांनी ताब्यात घेतले असून या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
शहराजवळ असणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलगी स्नॅपचॅटच्या माध्यमातून मैत्रिणींशी बोलत होती. यातून तिची ओळख तोहीद इकबाल पटाईत याच्याशी झाली. पटाईत याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले. व्हिडीओ तयार करून त्याने पिडीतेवर सहा महिन्यांमध्ये वारंवार अत्याचार केला. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करण्याची तसेच आई - वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्याने पिडीतेकडून दोन ते तीन लाख रूपये उकळले.
दरम्यान अल्पवयीन मुलगी शांत राहत असल्याचे आई - वडिलांना संशय आला. त्यांनी तिला विश्वासात घेवून विचारणा केल्यानंतर तिने सर्व प्रकार आई वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तोहीद पटाईत याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी पटाईत याच्यावर पोक्सो कायद्यानंतर गुन्हा दाखल केला मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता अखेर पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी त्याला कर्नाटकातून अटक केली आहे.