आंबा घाटात एलपीजी गॅस टँकर पलटी; चालकाचा जागीच मृत्यू
गॅस रिफिल प्रक्रियेमुळे आज रात्रीपासून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
शाहुवाडी : कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 वर आंबा गाव हद्दीत सरकारी दवाखान्याजवळ एलपीजी गॅस टँकर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. 26) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. त्यामुळे आंबा घाटातून जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, PB13- AW6116 क्रमांकाचा एलपीजी गॅस टँकर रत्नागिरीहून कोल्हापूरकडे येत होता. आंबा गावाजवळ चालकाने टँकर रस्त्याच्या कडेला थांबविला होता. चालक खाली उतरलेला असताना टँकर अचानक पुढे सरकू लागला. त्यावेळी चालक महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) हे ड्रायव्हर केबिनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना टँकर रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिल्पा यमगेकर, सुभाष मोरे, आप्पासाहेब पालखे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
दरम्यान, पलटी झालेल्या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये रिफिल करण्याची प्रक्रिया बुधवारी (दि. 27) रात्री 10 नंतर करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आंबा घाटातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रत्नागिरीकडून येणारी वाहतूक करुळ, भुईबावडा, गगनबावडा व अनुस्कुरा घाट मार्गे वळविण्यात आली असून कोल्हापूर, सांगली व पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहनांसाठीही गगनबावडा घाट हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. एस.टी. बससेवाही पर्यायी मार्गाने सुरू राहणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.