लवकरच भोंदू अशोक खरातवर चित्रपट येणार...‘या’ अभिनेत्रीने दिले संकेत
मुंबई – नाशिकच्या भोंदू अशोक खरातमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महिलांना अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकवणाऱ्या खरातच्या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या सारख्या राजकीय व्यक्तीचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. या अशोक खरातवर लवकरच सिनेमा येत असून त्यात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसणार असल्याचे अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे की, "भोंदू खरातविषयी मला 'बिग बॉस' स्पर्धेतून बाहेर आल्यावर कळलं, असा एक बाबा समोर आला ज्यानं सगळीकडे खळबळ माजवली. अशोक खरातवर लवकरच सिनेमा येत असून मी हा सिनेमा काढत नाही. या सिनेमाचे निर्माते वेगळे आहेत, पण या सिनेमात एक कलाकार म्हणून मी तुम्हाला दिसणार आहे. लवकरच सिनेमाची माहिती तुमच्यासमोर येईल. पण, अशा भोंदूपासून सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजं. हा एकटाच खरात नसेल तर असे अनेक खरात कुठे ना कुठे लपलेले असतील. कुठल्याही बाबाकडे जाताना जागरुकता ठेवा. लवकरच तुम्ही मला भोंदू खरातच्या सिनेमात पहाल असे त्यांनी म्हटले आहे.